राजकारण तापलं असतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्रात राजकरण ढवळून निघालं असताना आता राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यपालांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या सत्ता नाट्यात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने सरकार संकटात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना तब्बल ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे समर्थक आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यातील सत्तानाट्याला वेगळं वळणं लागण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारींना ताप येत होता. खबरदारी म्हणून त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचे आज अहवाल आले असून त्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं आज सकाळीच राज्यपाल कोश्यारींना रिलायन्स रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.