घरावर दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू
Monday To Monday NewsNetwork।
ठाणे, मंडे टू मंडे वृत्तसेवा : कळवा येथील घोलाई नगर परिसरात तीन घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांना वाचविण्यात टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. घोलाई नगर परिसरात चर्चच्या बाजूला असलेल्या तीन घरांवर आज (१९ जुलै) अचानक दरड कोसळली.
मुंबईतील मुसळधार पावसातील बळींचे सत्र सुरुच असून या पावसाने आत्तापर्यंत ३० नागरिकांचा बळी घेतला आहे. यात आज ठाण्यातील कळवा परिसरात घरांवर दरड कोसळून पुन्हा ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील चर्च रोडवरील घोलाई नगर परिसरातील दुर्गा चाळीत ही घटना घडली आहे.दरड कोसळल्य़ाने चार घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. यावेळी टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या ढिगाऱ्याखालून दोन जणांना जिवंत बाहेर काढले. तर या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता चेंबूर येथील न्यू भारत नगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला. त्यामुळे चार ते पाच घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी १६ रहिवाशांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले आहेत. १४ मृतांची ओळख पटली आहे.