भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यासा सुप्रीम कोर्टाचा नकार
मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नकार दिला आहे. याप्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज कोणताही स्पष्ट निर्णय दिला नाही. आता याप्रकरणाची पुढची सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे. आजच्या सुनावणीनंतर राज्य सरकारला नोटीस देण्यात आली आहे, मात्र तूर्तास कुठलाही आदेश दिलेला नाही .
जुलै महिन्यात झालेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन केलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झाल्याने राज्यात मोठं राजकारण रंगलं. निलंबित आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ करणे असे आरोप या आमदारांवर ठेवले होते. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं .