“पैसे घेऊन नगरसेवकांना कामे दिली” एका गुलाबरावांवर दुसऱ्या गुलाबरावांचा गंभीर आरोप
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या कार्यंलयांवर हल्ले देखील करण्यात आले आहेत. याबरोबरच शिवसैनिक आता बंडखोरी केलेल्या आमदारांवर विविध आरोप देखील करत आहेत. गुलाबराव वाघ यांनी देखील असाच गंभीर आरोप गुलाबराव पाटील यांच्यावर केलाय.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय गुलाबराव वाघ यांनी त्यांच्यावर पैसे घेऊन नगरसेवकांना कामे दिल्याचा धक्कादायक आरोप केला .गुलाबराव वाघ हे गुलाबराव पाटील यांचे अत्यंत निवटवर्तीय मानले जातात. वाघ यांच्या या गंभीरआरोपामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.या मुळे शिवसैनिक व बंडखोर संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत
धरणगाव मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात गुलाबराव वाघ यांनी धक्कादायक आरोप केले केले आहेत. गुलाबराव पाटील यांनी पैसे घेऊन धरणगाव नगरपालिकेतील नगरसेवकांना कामे दिली आहेत. फुकट कामे दिली असती तर काय फरक पडला असता? मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांनी तसं केलं नाही. याचा मी साक्षीदार असून हे मी गुलाबराव पाटील यांच्यासमोर बोलण्यास देखील तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच “गुलाबराव पाटील यांच्या अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत. त्या सर्व बाहेर काढू, असा इशाराच गुलाबराव वाघ यांनी दिलाय. गुलाबराव वाघ यांच्या या आरोपांमुळे आता जिल्ह्यात बंडखोर विरुद्ध शिवसैनिक यांच्यातील संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.