औरंगजेबच्या कबरीपुढे गुडघे टेकवणाऱ्याना त्याच कबरीत जावं लागेल, संजय राऊतांचा ओवैसी बंधूंना इशारा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्याने आता वाद निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ओवैसी बंधूंवर निशाणा साधला आहे. औरंगजेबाला मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडले आहे. तुम्ही जर आम्हाला आव्हान देणार असाल तर आम्ही तुमचे आव्हान स्वीकारुन त्याच मातीमध्ये गाडू असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणे हे रितीरिवाज नाही. वारंवार यायचं संभाजीनगरला आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला आणि महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असा या ओवैसी बंधूचे राजकारण दिसत आहे. परंतु इतकेच सांगेल त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीमध्ये आम्ही टाकले आहे. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पढताय कधीतरी त्याच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
औरंगजेब संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केले आणि महाराष्ट्रातील मंदिर प्रार्थना स्थळे उद्धवस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर २५ वर्ष मराठा योद्ध्यांनी लढाई लढली आहे. त्याच महाराष्ट्रात तुम्ही येऊन कबरीचे दर्शन घेऊन प्रार्थना कराल तर हे महाराष्ट्राला आव्हान देण्यासारखे झाले आहे. आम्ही आव्हान स्वीकारले असल्याचे समजा, औरंगजेबला याच मातीत जावे लागले होते. त्यांच्या भक्तांनासुद्धा याच मातीत जावे लागेल. महाराष्ट्राची माती मर्दांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे असे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओवैसी बंधूंवर तोफ डागली आहे.