मोठी बातमी : अखेर संजय राऊत ईडीच्या ताब्यात, छापेमारीनंतर मोठी कारवाई
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : पत्राचाळ प्रकरणात टांगती तलवार असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना नऊ तासाच्या चौकशीनंतर अखेर आज ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. राऊतांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं होतं. त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि पत्नी यांच्यासहित त्यांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. तसेच संजय राऊत यांच्या अडचणी आता पत्रचाळ प्रकरणात आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांची याच प्रकरणात चौकशी सुरू होती. तसेच संजय राऊत यांच्यावर भाजपकडून या प्रकरणात अनेक आरोप झाले आहेत.
त्यानंतर आज सकाळी सात वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी आणि विविध ठिकाणी पोहोचलं होतं. त्यानंतरच ईडीने संजय राऊत यांच्यावर हे कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातल्या राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या ई़डी कारवाईवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने राज्यभर आंदोलन सुरू केलेली आहेत.