सचिन वाझे यांना अखेर अटक, NIA ची कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (वृत्तसेवा)। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या आलिशान घराजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पियो मध्ये मुख्य सहभाग आणि मुख्य भूमिका बजावणाऱ्या सहसहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. वाझेंच्या अटेकमुळे पोलीस दलात खळबळ माजली असून आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही वाझे यांचा सहभाग आहे का?याबाबत एनआयए पुढील तपास करण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे यांना शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास NIA ने चौकशीसाठी पेडर रोड येथील कार्यालयात बोलवले होते. सलग १२ तासहून अधिक चौकशी केल्यानंतर मिळालेल्या जाबजबानीतून वाझे यांनीच मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या १७ कांड्यासह धमकीचे पत्र ठेवण्यात वाझे यांचीच भूमिका महत्वाची होती . त्यामुळे स्कॉर्पिओ गाडी व त्यात स्फोटके ठेवण्यामागचा मास्टरमाईंड वाझेच असल्याचे एनआयएच्या चौकशीतून पुढे आले. त्यामुळे शनिवारी रात्री ११.५० मिनिटांनी वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. वाझे यांच्यावर कलम २८६ , ४६५,४७३, ५०६(२), १२० ब भादवि आणि ४(ए)(बी)(आय)स्फोटके कायदा १९०८ याकलमांतर्गत वाझे यांची भूमिका आणि सहभाग निश्चित झाल्याने एआयकडून अटक दाखवण्यात आली आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता वाझे यांना एनआयएच्या सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, वाझे यांच्या अटकेमुळे पोलीस दलासह मुंबई पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली असून वाझे यांनी कोणाच्या सांगण्यावरून २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकयुक्त गाडी ठेवली होती. याचा तपास आता एनआयए करणार आहे. वाझे यांना निलंबित करावे आणि त्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजपने विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी वाझे यांना निलंबित करण्यासाठी मागणी लावून धरली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझे म्हणजे ओसाम बिन लादेन आहे का असा सवाल करत वाझेंची पाठराखण केली होती. त्यामुळे वाझे यांच्या अटकेनंतर महाविकासआघाडी याबाबत काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.