‘महिला सुरक्षा हा राष्ट्रीय प्रश्न! मोदी-शाह यांना सांगून… मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांच्या पत्रास उत्तर !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, वृत्तसंस्था। उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला पत्रानेच उत्तर दिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं म्हणत विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली होती. उद्धव ठाकरे यांनी आता पलटवार करत हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, तशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र जशास तसं
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या काळजीपोटी आपण पाठविलेले पत्र मिळाले. राज्यातील महिला असुरक्षित आहेत, असा आपला एकंदरीत सूर दिसतो. विशेषतः साकीनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय महिला मंडळांची शिष्टमंडळे राजभवनावर आपल्या भेटीस आली. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असल्याने याबाबत विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून चर्चा करावी, अशा आपल्या भावना आहेत. मी आपल्या भावना समजू शकतो. आपण आज महाराष्ट्र राज्याच्या घटनात्मक प्रमुख पदावर आहात. आपला पिंड राजकीय कार्यकर्त्याचा आहे. कायदा सुव्यवस्था, महिलांचे हक्क, रक्षण ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीच असते. या संसदीय प्रथा-परंपरांच्याच जाहीर चौकटीतून आपणही गेलेले आहात. त्यामुळे आम्हाला आपल्या अनुभवांचा नेहमीच फायदा झाला आहे.
बलात्काराची राजधानी अशी नाचक्की
महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना राज्य देश व समाजालाच कलंकित करतात, याची जाणीव मला आहे. साकीनाक्यातील घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार कठोर पावले टाकत आहे. पण महिलांवरील वाढते अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवरच चर्चा व्हायला हवी. गेल्या काही वर्षांत दिल्लीतील महिला अत्याचारांत कमालीची वाढ झाली. जगात दिल्लीची बदनामी झालीच व बलात्काराची राजधानी अशी नाचक्की झाली. दिल्लीची कायदा सुव्यवस्था हा केंद्राचा विषय आहे. हे खास नमूद करण्याची गरज नाही.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा