जळगावात अमली पदार्थ तस्करावर मोठी कारवाई; ११ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
जळगाव. मंडे टु मंडे न्युज | जळगाव मध्ये अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी सापळा रचून एका ५५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून १ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीन पावडर, २ किलो ११४ ग्रॅम गांजा आणि सुझुकी बर्गमन दुचाकी असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात एका व्यक्तीकडून अमली पदार्थांची विक्री केली जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक काळे यांच्या सूचनेनुसार कारवाईचे नियोजन करण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गांगणे यांच्या कार्यक्षेत्रात तसेच राजपत्रित अधिकारी चंद्रकांत अरुण वाडे यांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता दर्गा परिसरातील रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामानंदनगर, मेहरूण, जळगाव) हा मोपेडवरून येताना आढळून आला. त्याला पोलिसांनी थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे अमली पदार्थ आढळून आले. यामध्ये १ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीन पावडर आणि २ किलो ११४ ग्रॅम गांजा तसेच सुझुकी बर्गमन दुचाकी असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या पदार्थांची प्राथमिक फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये अमली पदार्थांचे अंश आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. इफेड्रीनचा वापर काही बेकायदेशीर अमली पदार्थांच्या निर्मितीत केला जाऊ शकतो, तर गांजाची स्वतंत्रपणे तस्करी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले इफेड्रीन व गांजा नेमका कुठून आणण्यात आला होता, तसेच या तस्करीच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पो.उ.नि. अशोक काळे, पो.उ.नि. दीपक जगदाळे, पो.उ.नि. संतोष काशिनाथ पवार, स. फौ. अतुल रघुनाथ वंजारी,स. फौ. जयंत भानुदास चौधरी पो.हे.कॉ. अक्रम याकुब शेख, विजय दामोदर पाटील, किशोर राजाराम पाटील, प्रवीण पुंडलिक भालेराव, मुरली चुडामण धनगर, महेश सोमवंशी, पो.कॉ. गोपाल उघडू पाटील, रविंद्र श्रावण कापडणे, प्रदीप सपकाळे, राहुल चंद्रकांत रगडे यांच्यासह फॉरेन्सिक पथकाचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव हे करीत आहेत.


