अत्याचारातून अल्पवयीन पीडितेने दिला बाळाला जन्म
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याने अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती राहून तिने एका बालकाला जन्म दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून समोर आली.
दोन वर्षांपूर्वी दीपक प्रकाश भिल (रा. भवाळे, ता. चोपडा) याची पीडित मुलीशी ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेत आरोपी दीपक भील याने पीडितेशी जवळीक साधली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवले. सुमारे दीड वर्षांपूर्वी, संशयित आरोपीने पीडितेचे तिच्या पालकांच्या ताब्यातून अपहरण करून नाल्याजवळ नेले. तिथे तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने पाच महिन्यांची गर्भवती असताना आरोपीला याबद्दल माहिती दिली होती मात्र आरोपी भिल याने जबाबदारी झटकत तिला दाद दिली नाही. अखेर दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी एका गोंडस मुलाला जन्म दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
या गंभीर घटनेची दखल घेत, महिला पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे (नेमणूक अमळनेर पोलीस स्टेशन) यांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. या जबाबाच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी दीपक भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

