रावेर आगाराच्या समस्यांवर आ. अमोल जावळे गंभीर, त्वरित सुधारणा करण्याचे आदेश, बसस्थानकातच कर्मचाऱ्याला फटकारले
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर आगारातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत आणि शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळण्याच्या अनेक तक्रारी आमदार अमोल जावळे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत काल संध्याकाळी आमदार जावळे यांनी रावेर बसस्थानकावर भेट देऊन प्रवासी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी समस्या जाणून घेतल्यानंतर, आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांना जबाबदार ठरवून बस वेळेवर सुटण्यासाठी आवश्यक सुधारणा सुचविल्या.
प्रवाशांच्या तक्रारीच्या संदर्भात जावळे यांनी आगार व्यवस्थापनाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. बसस्थानकाच्या परिसराची पाहणी करताना जावळे यांनी प्रसाधन गृह, आराम कक्ष आणि कर्मचाऱ्यांचे सुविधा कक्ष देखील तपासले. यावेळी, प्रवाशांची समस्या ऐकून समाधानकारक कृती घेणारे आमदार अमोल जावळे यांचे नेतृत्व स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले.
याच दरम्यान, एक कर्मचारी बसस्थानकात थुंकताना दिसला. हे लक्षात येताच, जावळे यांनी त्याला थांबवून सर्वांसमोर फटकारले. काही क्षणांतच, एक कर्मचाऱ्याने इतर कर्मचाऱ्याला माफी मागायला लावली. या घटनेवर बसस्थानकावर उपस्थित प्रवाशांमध्ये चर्चा सुरू होती.
यावेळी, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, एटीएस अधिकारी श्री. अडकमोल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सी.एस पाटील, दीपक पाटील, मनोज श्रावगे, रविंद्र पाटील यांसह अन्य पदाधिकारी आणि प्रवासी उपस्थित होते.