भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसचा आक्षेप, निवणूक आयोगाकडे तक्रार
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही गुप्त मतदानाचा भंग झाल्याचा आरोप आता आघाडीने भाजपच्या दोन आमदारांनी गुप्त मतदानाच्या नियमाचा भंग केल्याचा लेखी तक्रारीत म्हटलं आहे. तशी तक्रारच काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे.
राज्य निवडणूक अधिकाऱ्याने योग्य तो निर्णय न दिल्यास काँग्रेसकडून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसं झाल्यास राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेल्यास मध्यरात्रीच मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे आघाडीच्या हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला आले होते. दोन्ही आमदार गंभीर आजारी आहेत. तरीही व्हिलचेअरवरून या आमदारांनी विधान भवनात प्रवेश करून मतदानाचा हक्क बजावला. या दोन्ही आमदारांनी मतदान केल्यानंतर मतपत्रिका मतपेटीत टाकण्यासाठी सहकाऱ्याकडे दिली. त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हा निवडणूक नियमांचा भंग आहे, असं सांगत काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. निवडणूक अधिकाऱ्याने त्यानुसार पडताळणी सुरू केली आहे. तसेच काँग्रेसने आता थेट दिल्लीत निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.