हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का? ..तर आम्हाला फाशी द्या : नवनीत राणाचा हल्लाबोल
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार करणाऱ्या राणा दाम्पत्याला काल रात्री खार पोलिसांनी अटक केली. त्यानंतर खासदार नवनीत राणा (navneet ravi rana), आमदार रवी राणा दाम्पत्याचा मुक्काम खार पोलीस ठाण्यात होता. राणांना ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसाचे पठण करता आले नाही,पण त्यांनी पोलीस ठाण्यात रात्रभर १०१ वेळा हनुमान चालीसाचे पठण केलं.
याबाबत आमदार रवी राणा यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे.”उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्या प्रकरणी सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या कोठडीत रात्रभर १०१ वेळा हनुमान चालीसाचे पठण केले,”असे रवी राणांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
आज राणांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी टि्वट करीत जनतेला प्रश्न विचारला आहे. ”हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का? कलम १२४ (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा..देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की हनुमान चालीसा पाठ करणे गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या..” असे टि्वट नवनीत राणा यांनी केलं आहे.
राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली १५३ अ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.अॅड रिझवान मर्चंट आणि अॅड वैभव कृष्णा यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली.