साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात अवघ्या 18 दिवसांत आरोपपत्र दाखलu
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसंस्था। मुंबई येथील साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं आहे. 346 पानांचे आरोपपत्र दाखल करण्याआधी पोलिसांनी तब्बल 77 जणांचे जबाब नोंदवले आहेत. दिंडोशी येथील न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
77 जणांचे जबाब नोंदवले, 346 पानी आरोपपत्र
साकीनाका येथील महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप होत होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांसोबत बैठक घेत तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले होते. तसेच पोलिसांनीदेखील लवकरात लवकर तपास पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता पोलिसांना अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 77 जणांचे जबाब नोंदवून घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी दिंडोशी न्यायालयात तब्बल 346 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
राज्य सरकारकडून 20 लाखांची मदत
साकीनाका बलात्कार पीडितेचा मृ्त्यू झाल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांना मदत करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार, मुख्य सचिव, अपर उपसचिव आणि इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर बलात्कार प्रकरणावर चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी 20 लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती.
रागाच्या भरात केले अमानुष कृत्य
दरम्यान, साकीनाका बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात मोठा हाहा:कार उडाला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. तसेच चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबुल केला होता. तसेच आरोपी आणि पीडित महिला एकमेकांना ओळखत होते. आरोपीच्या मनात तिच्याबद्दल राग होता. त्यामुळे घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. यातच रागाच्या भरात आरोपीने अमानुष कृत्य केले. यामध्ये त्याने लोखंडी सळीचाही वापर केला होता. या घटनेनंतर पीडिता गंभीर जखमी झाली होती. यातच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.