भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद होणार! चंद्रकांत पाटील यांचे खळबळ उडवून देणारे वक्तव्य

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। राज्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. अर्ज छाननीतून रजनी पाटील बाहेर पडतील, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे रजनी पाटील या राज्यसभेच्या मैदानातून बाद होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

भाजपकडून संजय उपाध्याय यांनी राज्यसभेसाठी आज नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. रजनी पाटील यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहेत. छाननी करताना त्या बाहेर पडतील, असा दावा पाटील यांनी केला. मात्र, काय ऑब्जेक्शन आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मी कशाला सांगू. उद्यासाठी काही हवं की नाही, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

सातव यांच्या पत्नीला तिकीट का नाही दिलं?
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, असं काँग्रेसने अप्रत्यक्ष म्हटलं होतं. त्यासाठी राज्याची परंपराही काँग्रेसने सांगितली होती. त्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची परंपरा वगैरे तुम्हाला आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिलं नाही? राजीव सातव हे प्रविण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, संजय उपाध्याय, देवेंद्र फडणवीसांचे परम मित्रं होते. त्यामुळे सातव यांच्या पत्नीला तिकीट मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण तुम्ही रजनी पाटलांना तिकीट दिलं, असं ते म्हणाले.

व्हीप मोडला तरी निलंबित होत नाही
भाजपचा उमेदवार कसा निवडून येणार यावरही त्यांनी काही गणितं मांडली. दोन गोष्टींचा शकून घडला. 12 निलंबित आमदारांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यांना फक्त आवारात जाता येणार नाही. गेटवर जाऊन मतदान करता येणार आहे. राष्ट्रपती आणि राज्यसभेच्या निवडणुकीत व्हीप मोडला तर डिस्कॉलिफिकेशन होत नाही. त्यासाठी धाडस लागतं. मी कुणाला मतदान करणार आहे हे दाखवावं लागतं. पण त्यामुळे निलंबित होण्याची भीती याबाबत नसते, असं त्यांनी सांगितलं.

ते होऊ शकतात, आम्ही का नाही? राजकारणात काहीही होऊ शकतं. 56 वाले मुख्यमंत्री होतात. 54 वाले उपमुख्यमंत्री होतात. 44 वाले महसूल मंत्री बनतात. आमचे 106 आणि 13 अपक्ष आमदार म्हणजे 119 आमदार होतात. मग 119 वालेही राज्यसभेत जाऊ शकतात. उपाध्याय राज्यसभेत जाणारच. अजून अपक्ष मिळाले तर 127 किंवा 128 चा आकडाही आम्ही गाठू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

राजकारणात चान्स घ्यावा लागतो राजकारणात चान्स घ्यायचा असतो. प्रत्येकवेळी यशस्वी होतो असं नाही. पण अयशस्वी होतो असंही नाही. कशात काय आणि फाटक्यात पाय असतानाही ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री होऊ शकतात. ते होऊ शकतं तर हेही होऊ शकतं. आम्ही प्रयत्न करत आहोत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!