लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका; मुख्यमंत्री यांनी दिला शेवटचा इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (वृत्तसंस्था): मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक केली. ‘गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे चार महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. आता मात्र मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग पुन्हा वाढत आहे. परिस्थिती अजूनही नियंत्रणात असून हॉटेल, उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे आणि कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, गेल्या चार महिन्यांत सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर युरोपमध्येही कोरोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते. मात्र, अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील. पुढच्या काळात देखील आपल्याला कोरोनाबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे.
मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये त्यांना कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला होता. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हालाही आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे. सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल. मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.