१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: परीक्षा ऑफलाईन होणार !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई वृत्तसंस्था: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात देता येणार आहे. कारण त्याच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षा केंद्र ठरवण्याचा निर्णय यंदा घेण्यात आला असून इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान होणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, अशी महत्वाची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत दिली.
तसेच, नेहमी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ३ तासांचा कालवधी असतो मात्र यंदा तो कालावधी ३० मिनिटांनी अधिक वाढवून देण्यात आला आहे. याबरोबर ४० आणि ५० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी १५ मिनिटांचा कालावधी वाढून देण्यात आला असून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचीही माहिती शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली.
यासोबतच, दहावी आणि बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा (प्रॅक्टिक्ल परीक्षा) ही लेखी परीक्षेनंतर असाईनमेंट पद्धतीने होणार आहे. विशेष म्हणजे असाईनमेंट या लेखी परीक्षेनंतर शाळेतच गृहपाठ पद्धतीने विद्यार्थ्यांना द्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले. कला, वाणिज्य आणि व्यवसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावे लागणार आहे. इयत्ता दहावी किंवा बारावीच्या एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षांच्या कालावधीदरम्यान कोरोनाची काही लागण झाली असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन , कन्टेनमेंट झोन , संचारबंदी या कारणांमुळे परीक्षा किंवा असाईनमेंट देता आली नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल. परंतु या परीक्षेचे केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.