निवडणुका आणखी पुढे ढकलण्याचे संकेत,विजय वडेट्टीवार म्हणाले….
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध निवडणुकांचे वारे वाहात असून या सोबतच राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावातही अचानक वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकांसंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव
वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घेत मुख्यमंत्र्यांनी जनतेला निर्बंध नको असतील तर मास्क वापरा असं आवाहनही केलं . याच संदर्भात बोलताना
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, पुढील ८ ते १० दिवस महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या किती वाढतेय याचा आढावा घेतला जाईल. व निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर निर्णय घेतला जाईल. येणाऱ्या निवडणुकीला बराच वेळ आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कार्यक्रम ठरेल. पण कोरोना परिस्थिती गंभीर झाली झाली तर निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करावी लागेल असे वडेट्टीवार म्हणाले.
तसेच निवडणुक म्हटली म्हणजे लोकांची गर्दी आलीच,गर्दी झाली म्हणजे पुन्हा संसर्ग वाढेल. यामुळे निवडणुका टाळून पुढे ढकलता येतील का? याचा विचार केला जाईल. आम्ही आमच्या बाजूने विनंती करून प्रयत्न करू परंतु शेवटी
निवडणुका घ्यायच्या की नाही, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. आता त्यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी पुन्हा लांबणार की वेळेवर होणार ? हे पाहावे लागेल.