सेनेला पुन्हा मोठा धक्का, माजी मंत्री रामदास कदम यांचा शिवसेना नेते पदाचा राजीनामा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. “माझ्यावर अनेकदा टीका करण्यात आली. मात्र माझं म्हणणं मांडण्यासाठी मला मीडियासमोर कधीच जाऊ दिलं नाही. एवढेच नाही तर मला आणि माझा मुलगा योगेश कदम आमदार याला वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न पक्षातून झाला,” असा आरोप रामदास कदम यांनी केला
शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडात रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम शिंदे गटात सामील झाले. या बंडाच्या पार्श्वभूमीवर 25 जून रोजी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला रामदास कदम अनुपस्थित होते. मात्र एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत आपण पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही. मी मरेपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. “मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. मी कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. मुलांना मतदारसंघात त्रास दिला जातो हे खरं आहे. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच असणार आहे, असं रामदास कदम म्हणाले होते. परंतु आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
कोण आहेत रामदास कदम?
रामदास कदम हे 2005 ते 2009 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून रामदास कदम यांना महाराष्ट्र ओळखायचा. 2005 मध्ये त्यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली. सलग चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या रामदास कदमांचा 2009 मध्ये मात्र पराभव झाला होता. तेव्हा रामदास कदमांचं काय होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवत मोठी संधी दिली. 2010 मध्ये रामदास कदम विधानपरिषदेवर निवडून गेले. 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. 2016 मध्ये पुन्हा त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली. 2019 मध्ये त्यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेचा कोकणातील चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. कोकणात राणेंना टक्कर देणारा नेता म्हणून रामदास कदम हे नाव घेतलं जातं. शिवसेनेतील पहिल्या फळीतील एक आक्रमक आणि वजनदार नेते म्हणून रामदास कदम यांची आजही महाराष्ट्रात ओळख आहे. 2019 मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आणि रामदास कदम बाजूला पडले.