क्राईममहाराष्ट्र

तापी नदीत सापडले अभिनेता सलमान खान याच्या घराजवळील गोळीबारातील दोन्ही पिस्तूल

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेले दोन्ही देशी बनावटीचे पिस्तूल, तीन मॅगझीन आणि तेरा जिवंत काडतुसे दोन दिवसांपासून सुरू असलेले तापी नदी ऑपरेशन यशस्वी झाले असून मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ती जप्त केली आहेत.

सिने अभिनेता सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर पळून गेलेल्या दोन्ही शूटरला गुजरातच्या भूज येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल अशी या दोघांची नावे आहेत. चौकशीत त्यांनी गोळीबारानंतर दोन्ही पिस्तूल, मॅगझीन आणि काडतुसे सुरतच्या तापी नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गुन्ह्यांत पिस्तूल हस्तगत करणे हे पोलिसांसाठी एक आव्हान होते. त्यामुळे सोमवारी प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांचे पथक दोन्ही आरोपीसोबत सुरतला गेले. या पथकाने तापी नदीत पिस्तूलचा शोध सुरू केला होता. याकामी गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांसह मच्छिमारांनी मदत घेतली.

एक पिस्तूल सोमवारी रात्री हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. यानंतर आज गुन्हे शाखेने पुन्हा तापी नदीत पिस्तूलचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना दुपारपर्यंत आणखीन एक पिस्तूल, तीन मॅगझीन आणि तेरा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. अशा प्रकारे या पथकाने दोन दिवसांत गोळीबारात वापरलेले दोन्ही पिस्तूल, मॅगझीन आणि काडतुसे जप्त करून तापी ऑपरेशन यशस्वी केले.

न्यायवैधक प्रयोगशाळेचा अहवाल गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे दोन्ही पिस्तूलसह मॅगझीन आणि काडतुसे सापडल्याने आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पिस्तूल, मॅगझीन आणि काडतुसे फॉरन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोन्ही आरोपींना सलमान घरावरील गोळीबारप्रकरणी २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. या गोळीबारामागे लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांचा प्रत्यक्ष सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत दोन्ही बिष्णोई बंधूंना वॉन्टेड आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!