मंत्रिमंडळात १२ वीच्या परीक्षा रद्द करण्यावर चर्चा;आपत्ती व्यवस्थापनाकडे शिक्षण खात्याचा प्रस्ताव
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्य मंत्रिमंडळाची आज बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आजही १२ वीच्या परीक्षेचा निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्री परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने चर्चा झाल्याचं समजतंय. दरम्यान, आजच्या बैठकीत इतर राज्यांनी घेतलेल्या परीक्षांच्या निर्णयाची माहिती संपूर्ण मंत्रिमंडळाला अवगत करून दिली. तसंच शिक्षण खात्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन खात्याकडे पाठवला आहे. आता एक दोन दिवसात त्याबाबत चर्चा होऊन, निर्णय होईल असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. मुलांच्या आरोग्याला प्राधान्य आहे, जो केंद्राने निर्णय घेतला, त्याचं स्वागत राज्याने केलं आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत
कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि आजाराचा मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेच्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षा ऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा. तसंच, केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसुत्र धोरण निश्चित करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करता केंद्र सरकारने CBSE ची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.