आज पासून पुढील पाच दिवस ‘मोचा’ या चक्रिवादळाचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रातील बहुतांशन भागांमध्ये रविवारी ढगाळ वातावरण तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्याचं पाहायला मिळालं. सातत्यानं बदलणाऱ्या या हवामानामध्ये काही प्रदेशांना उन्हाचा तडाखाही सहन करावा लागला. आठवड्याच्या शेवटही पावसाच्याच सावटानं गेलेला असताना ८ मे २०२३ अर्थात सोमवारपासून पुढील पाच दिवसांसाठी देशभरातील हवामानावर ‘मोचा ‘ (Cyclone Mocha) या चक्रिवादळाचं सावट असणार आहे.
आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ वेगाने पुढे सरसावले असून कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्यामुळे आज चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मोचा (Mocha Cyclone) बंगालच्या हवामानावर तसेच संपूर्ण उत्तर भारतावर परिणाम करणार असल्यामुळे अनेक राज्यांना अलर्ट दर्शविण्यात आला आहे.
मोचा चक्रीवादळ हे वर्षातील पहिले चक्रीवादळ असल्यामुळे जागतिक हवामान संघटनेने (WMO) या संभाव्य वादळाला ‘सायक्लोन मोचा’ असे नाव दिले आहे. या चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ग्लोबल फोरकास्ट सिस्टम (GFS) मॉडेलने म्हटले की, मोचा 12 मे पर्यंत उत्तर, ईशान्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत प्रवास करेल. मे 2020 मध्ये सुपर चक्रीवादळ ‘अम्फान’ने कोलकात्यासह जवळजवळ संपूर्ण दक्षिण बंगालला उद्ध्वस्त केले होते.
बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिवादळसदृश परिस्थिती तयार होत असून, कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता ९ मे पर्यंत वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चक्रिवादळाचा प्रवास बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे होणार असून, त्यामुळं ८ ते १२ मे या काळात मुसळधार ते अतीमुसळधार पर्जन्यामानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वादळाचा हा इशारा पाहता समुद्र खवळलेला असेल, परिणामी मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. एकंदर परिस्थिती पाहता सध्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही बऱ्याच सतर्क असल्याचं स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रावर चक्रिवादळाचे काय परिणाम?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या परिस्थितीचे थेट परिणाम राज्यातील किनारपट्टी भागांवर होणार असून, या भागांना ११ मे पर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय परिणामस्वरुप मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही वादळी पावसाची हजेरी या काळात दिसू शकते असं सांगण्यात आलं आहे. मुंबईमध्ये येते काही दिवस, वातावरण ढगाळ असलं तरीही आर्द्रतेमुळं उकाडा हैराण करताना दिसणार आहे. शहराचत्या काही भागांत रिमझिम पावसाची हजेरीही पाहायला मिळू शकते.
येत्या २४ तासांमध्ये तापमान नेमकं कसं असेल याबाबतचा अंदाज वर्तवत स्कायमेटनं लडाख, काश्मीरचं खोरं, हिमाचलता पर्वतीय भाग आणि उत्तराखंडच्या काही भागात हिमवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागांत पावासाची हजेरी असेल. पुढील दोन दिवस देशातील बराच भाग काळ्या ढगांच्या सावटाखाली असेल असाही इशारा हवामान विभागानं दिला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा