येत्या ४८ तासांत कोसळणार मुसळधार पाऊस, राज्यातील “या” भागात पावसाचा इशारा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. परिणामी तापमानात वाढ झाली असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. अशातच येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, येत्या शनिवारपासून (ता. ६) हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने मंगळवारी वर्तविली आहे.
तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड,तर लक्षद्वीपमध्येही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि कर्नाटक किनारी भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या अनेक ठिकाणी थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.