चिंता वाढली! आजही गारपिटीसह पाऊस,अवकाळी पावसान विदर्भाला झोडपलं,”या” जिल्ह्यात मुसळधार पाऊस
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l हवामान विभागाने विदर्भात आणि मराठवाड्यात रविवारी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला होता. याप्रमाणे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. आजही पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मराठवाड्यातही काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे.उद्या मंगळवारी इथेही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात २० मार्चपर्यंत पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. आज यवतमाळ, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. या तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. इथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यात हवामान विभागाने चार-पाच दिवस पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, रविवारी रात्री अवकाळी पावसाने पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली असून मुसळधार पाऊस आल्याने याचा फटका आता पुन्हा शेतकऱ्यांना बसणार आहे. अमरावतीच्याही अनेक भागात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उन्हाळी हंगामातील तीळ, भुईमुग, काढणीला आलेल्या गहू पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस हजेरी लावत असला तरी दुसरीकडे काही भागांमध्ये उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. मुंबईसह पुण्यात आणि इतर जिल्ह्यांत ऊन वाढणार आहे. यामुळे तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याच्याही काही भागाला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. पुलगाव, वायफड शिवारात तुरळक गारपीट झाली आहे. पुलगाव, वायफड शिवारात अंदाजे दहा मिनिटं गारपीट झाली.