आता दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर राहणार बैठे पथक, महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दहावी बारावीच्या परीक्षांसाठी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकरांना आळा घालण्याकरता बैठे पथक तैनात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या पथकांकडून परीक्षा केंद्र आणि आवारत देखरेख करण्यात येणार आहे.
कॉपी करणे,पेपर फुटणे, असे अनेक गैरप्रकार परीक्षा काळात होत असतात. या गैरप्रकरांना आळा घालावा अशी मागणी अनेक आमदारांनी हिवाळी अधिवेशनातही केली होती. त्यामुळे हे गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक नियोजित करण्यात आले आहेत. या पथकात एकूण चार सदस्य असणार आहे. त्यापैकी दोन सदस्य परीक्षा केंद्रातील परीक्षागृहात फेरी मारतील तर, दोन सदस्य परीक्षा केंद्रातील आवारात देखरेख करणार आहेत. परीक्षा काळात कुठेही गैरप्रकार निदर्शनास आल्यास केंद्र संचालकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल.
परीक्षा काळात झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांचा घोळका असतो. झेरॉक्स सेंटर्समधून मिनी कॉपी पुरवल्या जातात. असे कॉपीचे प्रकार रोखण्याकरता परीक्षा केंद्रातील १०० मीटर पर्यंतच्या परीसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत.