आता आठवड्यातून तीन दिवस सुट्टी, १२ तास काम,१ जुलै पासून नवीन कामगार कायदा लागू होणार?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येत्या १ जुलै पासून केंद्र सरकारने देशात नवीन कामगार कायदा लागू करण्याची योजना आखली आहे. तसे झाल्यास १ जुलैपासून तुमचे कामाचे तास ८-९ नसून १२ तासांचे होऊ शकतात. परंतु, असे झाल्यास आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मोदी सरकार जुलैमध्येच हा कायदा लागू करण्याची योजना आखत आहे.
नवीन कामगार कायदा आल्या नंतर नवीन मसुद्याच्या नियमानुसार, कंपन्यांना अधिकार असेल की ते कामाचे तास १ दिवसात १२ तासांपर्यंत वाढवू शकतील. परंतु असे झाल्यास कामगारांना तीन दिवस सुट्टी देखील द्यावी लागेल. यासाठी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून चार दिवस १२ तास म्हणजेच ४८ तास काम करावे लागेल.त्या नुसार कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेतही बदल होणार आहेत. त्यांचा मूळ पगार एकूण पगाराच्या ५० टक्के किंवा त्याहून अधिक असावा. या अंतर्गत मूळ वेतन वाढवल्यास पीएफ आणि ग्रॅच्युइटीची रक्कम अधिक होईल. कारण पीएफचे पैसे मूळ पगारावर आधारित असतात आणि पीएफ वाढल्याने तुमचा दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराच्या रकमेत कपात होणार आहे. परंतु, दुसरीकडे पीएफ खात्यात अधिक रक्कम जमा होईल.
परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडून सांगण्यात आली नाही. परंतु, १ जुलैपासून कामगार कायद्यातील प्रस्तावित चार नवे नियम लागू होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
निवृत्तीमध्ये बदल काय होईल
नवीन श्रमसंहिता आल्यानंतर, कर्मचार्याकडे निवृत्तीवेळी जास्त पैसे शिल्लक असतील. कारण नवीन कायद्यानुसार त्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युइटीकडे जाणारे पैसे वाढलेले असतील. यामुळे कंपन्यांच्या खर्चातही बदल होईल. कारण ते कर्मचार्यांच्या पीएफच्या आधारे अधिक योगदान देतील आणि त्यांचा हिस्साही वाढेल.