आश्चर्यचं : महिलेला तब्बल १ लाख ४१ हजार ७८ वर्षांचा तुरुंगवास, असा काय गुन्हा केलाय या महिलेनं!
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आपण आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याच्या बातम्या ऐकल्या असतील, वाचल्या असतील. गुन्हेगारांच्या गुन्ह्यानुसार त्यांना जास्तीत जास्त काळ तुरुंगात डांबलं जातं. मात्र जगात एक अशी महिला आहे जिला एवढी शिक्षा सुनावण्यात आली आहे की तुरुंगवासाची आकडेवारी पाहूनच तुम्हाला मोठा धक्का बसेल. जगातील सर्वाधिक तुरुंगवास सुनावण्यात आलेली महिला म्हणून ती (कु)प्रसिद्ध आहे. या महिलेला तब्बल १ लाख ४१ हजार ७८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता तुम्हाला एक असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल की या महिलेने असा काय गुन्हा केला आहे .
आहे कोण ही महिला?
डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार थायलंडमधील चमोए थिप्यासो (Chamoy Thipyaso) या महिलेला कोर्टाने १९८९ साली १,४१,०७८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चमोएने ‘चिट फंड’च्या माध्यमातून १६ हजार २३१ जणांची फसवणूक केली होती. तिने या फसवणुकीमध्ये तब्बल १९ कोटींचा अपहार केला होता. ‘माय चामोय फंड’ नावाच्या चिट फंड कंपनीच्या माध्यमातून चमोए नावाच्या या महिलेनं अनेकांना गंडा घातलेला.
केरळ कनेक्शन आलं समोर
चमोए गंडा घातलेल्या लोकांमध्ये भारतातील केरळमधील अनेकांचा समावेश होता. गुंतवणुकीच्या मोबदल्यात एक ऑइल बॅण्ड प्रत्येक गुंतवणुकदाराला दिला जाईल आणि त्यावर फार रिटर्न्स मिळतील असा दावा करण्यात आला होता. चमोए ही थायलंडमधील सरकारी तेल कंपनी असलेल्या पेट्रोलियम अथॉरिटी ऑफ थायलंडची कर्मचारी होती. त्यामुळेच अनेकजण तिच्या या दाव्याला भुलले आणि त्यांनी मोठी गुंतवणूक केली.
शाही घराण्याला घातला गंडा
चमोएने या घोटाळ्यामध्ये सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचं दाखवण्यासाठी रॉयल थाय वायूसेनेमधील संपर्कांचाही वापर केला. त्यामुळेच हजारो लोकांनी तिच्या या कथित चिट फंडमध्ये गुंतवणूक केली. थायलंडमधील शाही कुटुंबातील सदस्य आणि लष्करी अधिकाऱ्यांनीही तिच्या चिट फंडमध्ये गुंतवणूक केली. मात्र १९८० च्या दशकामध्ये ही चोरी समोर आली. चमोएने लोकांकडून कोट्यवधी डॉलर्स घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एक एक करत समोर आलेल्या गुंतवणूकदारांची संख्या १६ हजारांहून अधिक झाली. हा चिट फंड बंद करण्यात आला आणि चमोएला अटक करण्यात आली.
…आणि म्हणून तिची सुटका झाली
चमोएला अटक करण्यात आल्यानंतर थायलंड वायू सेनेनं तिला गुप्त स्थानी ठेवलं होतं. फसवणूक झालेल्याचे पैसे परत मिळाल्यानंतर १९८९ साली चोमोएला विरोधात खटला चालवण्यात आला. कोर्टाने तिला शिक्षा सुनावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी मोठी शिक्षा सुनावण्यात आल्यानंतरही ही महिला केवळ ८ वर्षच तुरुंगामध्ये राहिली. यामागील कारण म्हणजे थायलंडमध्ये संमत झालेला नवा कायदा. फसवणुकीचा कोणताही गुन्हा असला तरी आणि कितीही वर्षांची शिक्षा झालेली असली तर त्या व्यक्तीला २० वर्षांहून अधिक काळ तुरुंगामध्ये ठेवता येत नाही असं स्पष्ट करण्यात आलं. चमोएला जितक्या वर्ष तुरुंगात होती तो कालावधी आणि फसवणुकीच्या गुन्ह्याचं स्वरुप पाहता तिला ८ वर्षांनी सोडून देण्यात आलं.