ठाकरे सरकार लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। देशासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल असा अंदाज आहे. त्यामुळे लसीकरणाला गती देण्याचं काम सुरू आहे. सध्या अनेक ठिकाणी निर्बंधातून सूट देण्यात आल्यानं लोक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील लॉकडाऊनबद्दल लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी याविषयीचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर बोलताना टोपेंनी लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दल सूचक विधान केलं. राज्यातील कोरोना स्थिती आणि लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचं टोपेंनी सांगितलं. मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल लवकरच निर्णय घेतील, असं टोपे म्हणाले.
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांसमोर एक प्रस्ताव मांडला. एक तर कठोर निर्बंध लागू करावेत किंवा सरसकट सूट देण्यात यावी, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यांनादेखील ही भूमिका पटली, असं टोपे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या गोष्टीचा आणि राज्यातील परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री अभ्यासाअंती योग्य निर्णय घेतील, असं टोपेंनी सांगितलं.राज्याच्या सर्व भागांतील परिस्थिती, तिथली आकडेवारी आणि तयारी यांचा विचार करून जनतेचा हिताचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री ठाकरे लवकरच हा निर्णय जाहीर करतील, असं टोपेंनी म्हटलं. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री ठाकरे लॉकडाऊनबद्दल लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागांतील बाजारपेठा, पर्यटनस्थळांवर सध्या गर्दी दिसून येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.