भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

वीज तोडणी प्रकरणी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय,पुढील तीन महिने वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शेतकऱ्यांची वीज तोडणी प्रकरणावरुन अधिवेशनात आज विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. यानंतर विधानसभेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना प्राथमिकता द्यावी हे उद्दीष्ट समोर ठेवून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन सांगू इच्छितो की, वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीज जोडणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत आगामी तीन महिने कृषी वीज ग्राहकांची वीज तोडणी आम्ही तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मला जाणीव आहे की महावितरण शासनाच्या मालकीची आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान, विजबिलापोटी मिळणारे पैसे हे उत्पन्नाच साधन आहे. महावितरणची ग्राहकांकडून येणारी थकबाकी 64 हजार कोटी इतकी आहे. यापैकी कृषी पंप धारक शेतकऱ्यांची थकबाकी 44 हजार 920 कोटी रुपये आहे. सरकार हे मुद्दाम करत नाहीये. याच नाही मागच्या सरकारने शेतकऱ्यांना बील दिली नाही. देशात आणि राज्यात विजेचा तुटवडा झाला तरी लोड शेडिंग होऊ दिला नाही. शेतकऱ्यांची मागणी चा विचार करतो, पण महावितरण चा विचार करावा लागतो.

शेतकऱ्यांची वीज तोडणी आम्ही थांबवत आहोत. वीज ग्राहकांना विनंती आहे… आम्ही सवलती देत असलो तरी तुम्ही तुमची बिले वेळेवर भरा असंही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
वीज तोडणीच्या मुद्द्यावरुन आज विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं, “चर्चा नको, निर्णय करा ! रोज शेतकरी आत्महत्या होत असताना सावकारी वसुली सुरू आहे. वीज जोडणी तोडणे बंद करा, ही सर्वांची भावना आहे.आताच्या आता घोषणा करा. तोवर कोणतेही कामकाज करू नका.”

प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा-घोषणा कसल्या करता? त्यातील एकही घोषणा पाळली जात नाही. रोज शेतकरी आत्महत्या करतो आहे. आम्हाला श्रेय नको, हवे तर सत्ताधारी पक्षाची मागणी समजा. पण तातडीने निर्णय जाहीर करा. वीज तोडणे बंद करा आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्या अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर यावर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं, या निर्णयाने आमचे समाधान नाही. आमचे सरकार आले तर आम्ही पाच वर्ष एकाही शेतकऱ्याचे वीज कापणार नाही. कंपन्या या महाविकास आघाडी सराकारच्या भ्रष्टाचारामुळे डबघाईला आल्या आहेत. आमच्या काळात त्या नफ्यात होत्या. यांनी शेतकऱ्यांच्या नावाने खोटे बोलू नये.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!