परतीच्या पावसाचा धुमाकूळ, राज्यात आजही पावसाचा यलो अलर्ट
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. या पावासामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात तर पावसानं तुफान बॅटींग केली आहे. पुण्यात अनेक भागात पाणी शिरलं आहे. दुसरीकडं कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, वाशिम या जिल्ह्यांना पावसानं चांगलचं झोडपून काढलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टे देण्यात आला आहे.
राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आला आहे. त्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. या परतीच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे. सर्वात जास्त सोयाबीन आणि कापूस पिकाला बसला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
पुण्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारीपर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पाणी लागलं आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे. या पावसामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तसेच अहमदनगर शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज (18 ऑक्टोबर) हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार केला आहे. असे असतानाच हवामान विभागाकडून कोल्हापूरसह 9 जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणमधील परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. कोल्हापूर तसेच मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाने चालू मोसमात जून महिन्याचा अपवाद वगळता चांगली साथ दिली होती. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नव्हती. त्यामुळे शिवारातील पीके जोमात आली होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने कोल्हापूर शहर परिसराह जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने उभ्या पिकांची पार नासाडी झाली आहे. या पावसाचा फटका सर्वाधिक सोयाबीन पिकाला बसला आहे. सोयाबीन पीक पोसले असतानाच परतीच्या पावसाने दणका दिल्याने त्याला मोड येऊ लागली आहेत.