दोघां दुचाकीस्वारांचा पहाटेच सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुंबई मधुन गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली असून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेरच गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पहाटे :४.५५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
सलमान खानला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका टेलिव्हिजन मुलाखतीत त्याने उघडपणे सांगितलं होतं की, सलमान खानला मारणं हेच त्याच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानावरही त्याने हल्ला केला होता आणि सलमान खानशी जवळच्या संबंधांमुळे हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं होतं. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता.
या अभिनेत्याला सध्या वाय प्लस सुरक्षा असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय बाब आहे की, गेल्या वर्षी सलमान खानच्या ऑफिसला धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला होता. सलमानच्या जवळच्या प्रशांत गुंजाळकरला रोहित गर्गकडून धमकीचा मेल आला होता. ईमेल प्रकरणात आयपीसीच्या कलम ५०६ (२), १२० (बी) आणि ३४ अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता ही गोळीबाराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.