दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता – राजेश टोपे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. सध्या जरी तिसऱ्या लाटेची शक्यता नसली तरी दिवाळीनंतर कोरोनाचे प्रमाण वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. काल, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यतेखाली राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे वर्तवण्यात आले.
आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘राज्यात ७० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आणखीन वेगाने लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाला. देशातील १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार करण्यात महाराष्ट्राचा मोठा हातभार आहे. दरम्यान मराठवाड्यात सोयाबिन काढणीची काम होती, तसेच इतर कारणामुळे मिशन कवच कुंडलची गती मंदावली होती. मात्र दिवाळीनंतर मिशन कवच कुंडल आणखीन वेगाने राबवणार आहे. या मिशनमध्ये उर्वरित लोकांनी सहभागी होऊन महाविकास आघाडी सरकारला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आहे.’
राज्यात नवीन व्हेरियंट नाही
‘नगर, नाशिकच्या सीमेवर कोरोना वाढला असला तरी घाबरुन जाण्याची गरज नाही. राज्यात कोणताही नवीन कोरोनाचा व्हेरियंट निर्माण झाला नाही. दर आठवड्याला एनआयव्ही १०० नमुन्यांची चाचणी करत आहेत. त्यामध्ये कोणताही नवीन व्हेरियंट आढळला नसून फक्त डेल्टा व्हेरियंट राज्यात सर्वत्र आहे. तसेच दिवाळी नंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज टास्क फोर्सच्या बैठकीत वर्तवण्यात आला आहे. जर कोरोनाच्या नियमांचे व्यवस्थित पालन केले तर तिसरी लाट येऊ शकत नाही. दरम्यान राज्यात दररोज दीड लाख चाचण्या होत आहेत. चाचण्या करण्यात दोन लाख हा आकडा उच्चांकी आहे. आपण चाचण्या कमी केल्या नाहीत. त्यामुळे मागील दोन-चार महिन्यांत कोरोना पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याचे दिसत आहे. दुसरी लाट देखील मंदावली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपयोजना आणि लसीकरण महत्त्वाचे आहे. तसेच केंद्राची परवानगी मिळाली तर राज्यात लवकरच लहान मुलांचे लसीकरण सुरू करू,’ असे राजेश टोपे म्हणाले.