भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसला गोव्यामध्ये तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांचा जोरदार धक्का

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला गोव्यामध्ये जोरदार धक्का दिला आहे. गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विसर्जित केला आहे. चर्चिल यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहित तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत जागा देण्याची विनंती केली आहे.

आतापर्यंत तृणमूल पक्षात सामील होण्याचा निर्णय सतत लांबणीवर टाकणारे बाणावलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे सोमवारी त्यांची कन्या वालंका आलेमाव हिच्यासह तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. दरम्यान या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. चर्चिल यांनी पक्षातील सर्व सदस्यांसोबत आज तृणमूल पक्षात प्रवेश केला. चर्चिल आलेमाओ यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहित राष्ट्रवादीचा विधिमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विसर्जित केल्याची माहिती दिली. तसेच, तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत जागा देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली आहे.

केवळ पश्चिम बंगालमध्ये दबदबा कायम ठेवणार्‍या तृणमूल काँग्रेसने इतर राज्यात देखील हातपाय पसरण्यासाठी सुरुवात केली. तृणमूलने गोव्यात प्रवेश करत विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षाच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जी दोन दिवसीय गोवा दौर्‍यावर आहेत. रविवारी त्या गोव्यात दाखल झाल्या. दरम्यान, गोव्यात आमदारकीचे खाते उघडण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पवारांनाच धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या एकमेव आमदारासह राष्ट्रवादीचा विधिमंडळ गटच तृणमूलमध्ये विसर्जित केला. चर्चिल आलेमाव यांच्या पक्षप्रवेशाने तृणमूल काँग्रेसचा गोव्यात एक आमदार निश्चित झाला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या धक्क्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल. देशात विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांसोबत ममता बॅनर्जी गेल्या काही काळात भेटीगाठी घेतल्या. मात्र, गोव्यात विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून पवारांनाच धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी २०२२ मध्ये होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. याआधी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेससह प्रसिद्ध अभिनेत्री नफिसा अली आणि गोव्यातील उद्योजिका मृणालिनी देशप्रभू यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!