पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस विभागात खळबळ
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। पोलिस उपनिरीक्षकाने तणावातून घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली. नागपूर येथील यशोधरानगर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक गोपाळ गोळे, वय ३४ वर्ष, रा. पोलिस क्वार्टर क्रमांक ९४, गिट्टीखदान, मूळ गाव, परतवाडा, यांनी ही आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्यांच्या भावाचा अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून ते तणावात होते. विशेष म्हणजे, २०१७ साली ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी त्यांना प्रशिक्षणादरम्यान मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याने काढण्यात आले होते. त्यानंतर दोन बॅच पुढे त्यांनी पुन्हा प्रशिक्षण पूर्ण करीत, पोलिस उपनिरीक्षक म्हणून नागपुरात यशोधरानगर येथे रुजू झाले. पोलीस ठाण्यात ते कुणाशी बोलत नव्हते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांची पत्नी सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गावाकडे गेली होती. रविवारी रात्री ते घरी आले. त्यानंतर सोमवारी सकाळी ते दार उघडत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, ते लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना खाली उतरवून मेयो रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याने ते ठाण्यातून नेहमीच गैरहजर राहायचे. सहा ते सात महिने ते गैरहजर होते. त्यामुळे बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान याच परिस्थितीतून त्यांनी आत्महत्या केल्याचाही कयास पोलिसांकडून लावण्यात येत आहे.