मोठी बातमी ; राज्यात पुन्हा भूकंम्प होणार?शिंदे गटात नाराजी? मुख्यमंत्री तातडीने मुंबईला रवाना
नागपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागातासाठी नागपूरला आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्या परतीचे कारण अद्याप समजले नसले तरी राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कधी काय होईल याचा अंदाज लावणंही अशक्य झालं आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण राष्ट्रवादीसोबतच शिवसेनेतही वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा तडकाफडकी नागपूरहून मुंबईला परतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. मात्र मुख्यमंत्री रात्रीच घाईघाईनं मुंबईला परतले. ते आज पुन्हा नागपूरला परतणार होते, मात्र आता त्यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं काल (मंगळवारी) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागपुरात आगमन झालं. आज सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. नागपूरमध्ये राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील नागपूरात थांबणार होते. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री गडचिरोली आणि नागपूरमध्ये थांबणार होते. मात्र, राष्ट्रपतींचा आजचा मुक्काम असलेल्या राजभवनात त्यांना सोडल्यानंतर मुख्यमंत्री तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान शिंदे गटात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांचं येणं शिंदे गटातील बऱ्याच आमदारांच्या पचनी पडलेलं नाही, असंही बोललं जात आहे. शिंदेंचं तडकाफडकी मुंबईला येणं आणि त्यानंतर राष्ट्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर असूनही दौरा रद्द करणं यांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांचा नागपूर दौरा नेमका का रद्द केला हे बघणं महत्वाचं ठरेल.