सात लाखाचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नंदुरबार (प्रतिनिधी): शहरातील रामचंद्रनगर परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री करतांना आढळून आल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकुण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शहरातील रामचंद्रनगर परिसरात एक इसम महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला विमल/गुटखा अवैधरित्या विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली. त्यानुसार कार्यवाहीसाठी त्यांनी पथक तैनात केले. एक इको कंपनीची राखाडी रंगाची (गाडी क्र.एम.एच.१५, एफ.एफ.७२४३) एका पत्राच्या शेडमध्ये उभी दिसली. त्याठिकाणी ओम गगनदास धनवानी हा गुटखा चोरटी विक्री करतांना मिळून आला व काही माल गाडीच्या बाजूला पडलेला दिसून आला. गाडीत बसलेल्या इसमास ताब्यात घेऊन, त्याच्या ताब्यातील गाडीची व मालाची तपासणी केली असता, त्याच्याकडे महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा मिळून आला. त्यामुळे त्याला मुद्देमालसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७ लाख ५ हजार ७७८ रूपयांचा गुटखा व ३ लाखाची चारचाकी असा एकुण १० लाख ५ हजार ७७८ रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात ओम गगनदास धनवानी रा.सिंधी कॉलनी, नंदुरबार याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोना राकेश मोरे, पोना दादाभाई मासुळ, पोशि अभय राजपूत, पोशि आनंदा मराठे, पोशि राजेंद्र काटके यांनी केली.