कोरोनातुन मुक्त झालेल्याची जाऊ शकते दृष्टी? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा लाखाच्या खाली आला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र कोरोनामुक्त झालेल्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोनावर मात केल्यानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच कालावधी लागतो. या कालावधीला ‘लाँग कोविड’ म्हटलं जातं. या कालावधीत अनेक प्रकारच्या शारिरीक समस्या उद्भवतात.
कोरोना विषाणूचा रुग्णाच्या डोळ्यांवर काय परिणाम होतो, त्यातून संबंधित व्यक्ती कशी बरी होऊ शकते, याबद्दल दिल्लीतील मणिपाल रुग्णालयाचे डॉ. वानुली वाजपेयी यांनी महत्त्वाची माहिती दिली. ‘कोरोनाची लागण झाल्यावर किंवा कोरोनामुक्त झाल्यानंतर बऱ्याचदा डोळ्यांवर फारसा परिणाम होत नाही. काही रुग्णांमध्ये कंजेक्टिवायटिस सारखी लक्षणं दिसून येतात. दीर्घ कालावधीसाठी डोळ्यांचा त्रास सहन करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे,’ असं वाजपेयींनी सांगितलं.कोरोनाची लागण झाल्यानंतर कंजेक्टिवायटिसची लक्षणं दिसून येतात. औषधांच्या मदतीनं कंजेक्टिवायटिस लवकर बरादेखील होतो. मात्र काही रुग्णांच्या बाबतीत रेटिनावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे दृष्टीवर विपरित परिणाम होतो. अनेकदा रेटिनामधील धमन्यांमध्ये ब्लॉकेज होतं. त्यामुळे दृष्टी जाण्याचा धोका निर्माण होतो.