खरंच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला एक अंकी जागा दिल्या जातील? फडणवीसांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांना सांगितलं…
नविदिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर इतर जागांबाबत सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राच एकही नाव नाही, येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. दिल्लीतील भाजपच्या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मित्र पक्षांच्या एक आकडी उमेदवारीबाबत भाष्य केलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक अंकी जागा मिळतील, अशा बातम्या बुधवारी सकाळीपासूनच काही माध्यमांनी प्रसारित केल्या होत्या. त्यावरुन फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. मीडियाने स्वतःहून असं ठरवणं आणि धादांत चुकीच्या बातम्या देणं चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले.
नक्कि काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भाजपने पहिल्या यादीमध्ये ज्या जागा जाहीर केल्या आहेत तिथे भाजप स्वतंत्र आहे. इतर ठिकाणी भाजप अलायन्समध्ये असल्याने त्यावर चर्चा सुरु आहेत. त्यानंतर जागावाटप जाहीर केलं जाईल.
प्रत्येक राज्यासोबत केंद्रीय नेतृत्वाकडून चर्चा केली जात आहे. आज महाराष्ट्रातील आम्ही नेते चर्चेसाठी आलेलो असून युतीमध्ये असलेल्या राज्यांची यादी लवकरच देणार आहोत.
मित्र पक्षांना एक डिजिट जागा मिळतील, असं सांगणं म्हणजे पतंगबाजी आहे. अशा प्रकारे बतावण्या करणं योग्य नाही. आमच्या दोन्ही साथीदारांना योग्य तो सन्मान देऊन जागा दिल्या जातील.