भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

गृहमंत्रीपद काय असते याचा हिसका दाखवा– एकनाथ खडसे

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा असे सांगत दोन, चार नेत्यांना वर्षभरापूर्वी आत टाकले असते तर आज ही परिस्थिती नसती असे विधान केले आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोरच एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केले आहे. शरद पवार जळगाव दौऱ्यावर असून यावेळी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी गृहमंत्र्यांना कडक भूमिका घेण्याचे आवाहन केले.

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाया सुरू आहेत. महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह संजय राऊत यांच्याविरोधात विविध प्रकरणांत ईडी, आयकर आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, या कारवाया राजकीय सूडातून सुरू आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नवनवे आरोप करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या या कारवायांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, वळसे पाटील यांना मी अनेकदा गृहमंत्रीपदाचा हिसका, इंगा दाखवा असे सांगत असतो. यांची शेकडो प्रकरणं आहेत. दोन चार लोकांना जर वर्षापूर्वी आत टाकले असते तर ही परिस्थिती आली नसती. जे सत्य आहे ते करा, कोणाला छळू नका, द्वेषाचे राजकारण करु नका. पण ज्यांनी केले आहे त्यांना भोगायला लावा, तर मग ही परिस्थिती निर्माण होणार नाही,” असे आवाहनच एकनाथ खडसेंनी केले आहे. अनेकांचे सहकार्य लागते, त्याशिवाय मी मुख्यमंत्री शर्यतीपर्यंत गेलो नव्हतो. पोरी बाळींच्या नादी लागून कोणी जात नसते. त्याला क्षमता लागते. जनतेने ४०-४० वर्ष आम्हाला निवडून दिले. माझेच पाय धरणारे, बोट धरणारी पोरं आज शिकवू लागलेत आणि शरद पवारांवर बोलू लागले याचे आश्चर्य वाटू लागले आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान शेवटी बोलतांना खडसे म्हणाले की, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून काही कारण नसताना अनिल देशमुखांच्या घऱावर १०० पेक्षा जास्त धाडी पडतात. आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मलाही उगाच अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण मी जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा. सरकारला माझी विनंती आहे की, जे सत्य आहे ते जगाच्या समोर आणले पाहिजे, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!