सावदा शहराध्यक्षासह कार्यकारणीचा अजित पवार गटात प्रवेश !
सावदा, ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | राज्यात सत्तेत नुकतेच सहभागी झालेले नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सावदा शहराध्यक्षासह विविध आघाडीच्या पदाधिाऱ्यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसह भाजप-शिवसेनेचा मंत्रिमंडळात समाविष्ट झाले. त्यामुळे राष्ट्रवादीतही शिवसेनेच्या पुनरावृत्तीचा अनुभव राज्यातील जनतेला आला. काका-पुतण्यातच पक्षाचे दोन गट पडले. त्यामुळे राज्यातील सारेच अचंबित झाले होते. यानंतर राज्यभरात गाव शहरामध्ये राष्ट्रवादीतली राजकीय समीकरणे बदलत आहे.
नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सावदा शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कुशल जावळे, युवक शहराध्यक्ष गौरव वानखेडे यांच्यासह माजी नगरसेवक, महिला आघाडी, सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी अजित पवार यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे ना. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अजित पवार गटात स्वागत केले.
दरम्यान, सावदा येथे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि त्यांच्या सहकार्यांनी ना. अनिल पाटील यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते मनीष जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, अभिषेक पाटील, माजी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.