पेट्रोल -डिझेल स्वस्त होणार?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिक मोठा चिंतीत होता. परंतु, आगामी दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होईल. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होती. त्यामुळे वाढलेली महागाई देखील कमी होईल. त्यामुळे सामान्य नागरिकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकतो. मूडीज अॅनालिटिक्सने अलीकडेच आशिया पॅसिफिकच्या संदर्भात एक अहवाल जारी केला असून या अहवालात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होऊ शकते असे म्हटले आहे.
मूडीजने जाहीर केलेल्या आपाल्या अहवालात म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 120 डॉलरवर पोहोचली होती. परंतु, ही किंमत आता शंभर डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली आहे. घसरणीचा हा ट्रेंड पुढे असाच चालू राहू शकतो. 2024 च्या अखेरीस कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरपर्यंत खाली येऊ शकते.
दरम्यान, यापूर्वी जुलैमध्ये सिटी ग्रुपनेही कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली होती. सिटीग्रुपने म्हटले होते त्यानुसार 2022 च्या अखेरीस कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 65 डॉलरपर्यंत घसरू शकते.
कच्च्या तेलाच्या किमतींचा इतिहास पाहिला तर ज्या-ज्या वेळी जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे, त्या-त्या वेळी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. 2008 मधील मंदीच्या काळात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 149 डॉलरवरून 35 डॉलर प्रति बॅरलवर घसरण झाली होती. तर कोरोना महामारीच्या काळात जगभरातील लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 20 डॉलरपर्यंत घसरली होती.
कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानंतर भारतासाठी ही दिलासादायक बाब असणार आहे. कारण भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 80 टक्के तेल आयात करतो. कच्च्या तेलाच्या आयातीवर आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीचा मोठा हिस्सा खर्च करावा लागतो. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तर सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळणार आहे.