वाहनांना ‘फास्टटॅग’ लावण्यास अधिकची मुदतवाढ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व वाहनांसाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केला आहे. परंतु आता सरकारने यात वाहन चालकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने फास्टॅगची शेवटची तारीख वाढून 15 फेब्रुवारी केली आहे. जर तुमच्या गाडीला अजूनही फास्टॅग लावला नसेल, तर आणखी दिड महिन्यांचा कालावधी आहे.
याआधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर कॅश कलेक्शन बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता यासाठीची वेळ मर्यादा वाढवण्यात आली असून फास्टॅग लावला नसेल, तर आणखी दिड महिन्यांचा कालावधी आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोल प्लाझावर गाड्यांच्या लांबच लांब रांगांपासून सुटका होण्यासाठी फास्टॅग सिस्टम आवश्यक आहे.
फास्टॅग ई-कॉमर्स साईट अॅमेझॉवर, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि पेटीएमवरुन खरेदी करता येतो. त्याशिवाय कोणतीही बँक, पेट्रोल पंप किंला टोल प्लाझावरही फास्टॅग खरेदी करता येतो. बँकेतून फास्टॅग खरेदी केल्यास, ज्या बँकेत खातं आहे, त्याच बँकेतून फास्टॅग खरेदी करणं आवश्यक आहे. फास्टॅग 200 रुपयांत खरेदी करून कमीत कमी 100 रुपये रिचार्ज करावा लागतो. तसंच, FASTag जेथे खरेदी केला आहे, तिथेच तो रिचार्ज करा. म्हणजेच ज्या बँकेतून तो खरेदी केला आहे, त्याच बँकेतून तो रिचार्ज करावा लागेल. जर ग्राहकाने दुसऱ्या बँकेतून FASTag रिचार्ज केल्यास, त्याला 2.5 टक्के लोडिंग चार्ज द्यावा लागेल. म्हणजेच 1 हजार रुपयांचा रिचार्ज केल्यास, त्यावर 25 रुपये अधिक द्यावे लागतील.
फास्ट टॅग लावलेली वाहने टोलनाक्यावर आल्यास, रेडिओ प्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्यावर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनांवरील टॅग वाचेल. त्यानंतर टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून जातात व वाहनधारकाला याची माहिती त्याच्या नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावर मिळते. या योजनेमुळे टोलनाके कॅशलेस तर होतीलच शिवाय, वेळेची ही बचत होणार आहे. तर, फास्ट टॅगचे विशिष्ट अकाउंट तयार असेल, त्यातूनच टोलचे पैसे कापले जाणार असून, टोलनाक्यावर वाहनांची ओळख देखील होणार आहे.