आता सरकारी एसटी बस मधूनच शाळांच्या सहली,खासगी बस वापरल्यास कारवाई
पुणे,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आता सरकारी एसटी बस मधूनच शाळेच्या सहली काढता येणार आहे.शिक्षण विभागाच्या अटी आणि शर्तींचे पालन न करता स्कूलबस किंवा खासगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणा-या खासगी वाहनांवर कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा वस्तुस्थितीदर्शक स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा, असे स्पष्ट आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिराणकर यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली आता सरकारी बसने अर्थात लालपरी घेऊनच कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहल म्हणजे शालेय जीवनात ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन ज्ञान मिळवणे,आणि यामाध्यमातून विद्यार्थ्यांना नविन काहीतरी शिकण्याची संधी मिळवून देणे हा उद्देश असणे गरजेचे आहे. परंतु शाळांच्या सहलींसाठी बहुतांश वेळा वॉटर पार्क, रिसॉट्र्स, बागबगिचे आदींना प्राधान्य दिले जायचे. यामध्ये बदल करण्यात येऊन शाळांच्या सहली आता ऐतिहासिक स्थळांकडे नेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळण्याबरोबरच सांस्कृतिक, भौगोलिक, शैक्षणिक गोष्टी अनुभवण्यासाठी ऐतिहासिक स्थळी सहली नेण्यात येणार आहेत.
सरकारी निर्णयात शाळांनी सहलीसाठी सरकारच्या एसटीलाच प्राधान्य द्यावे हा नियम आहे. परंतु खासगी शाळांचा स्वत:च्या स्कूल बस सहलीसाठी वापरण्याचा आग्रह असतो किंवा खासगी बसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु परिवहन विभागाच्या आदेशाने आता स्कूलबस किंवा खासगी वाहनाने सहल काढल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शाळांना सहलींसाठी आता लालपरीचा वापर करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालय संचालक शरद गोसावी यांनी सांगितले की, सहलींसाठी शिक्षणाधिका-यांची परवानगी घेऊन शाळांच्या सहली या सरकारी एसटीनेच घेऊन जाणे गरजेचे आहे. ५० विद्यार्थ्यांमागे पाच शिक्षक घेऊन जाणे गरजेचे आहे. विद्यार्थीनी असतील तर महिला शिक्षक असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सहलींसाठी शिक्षण विभागाची जी नियमावली आहे त्या नियमावलीचे शाळांनी पालन करणे गरजेचे आहे.

