खाद्य तेलाच्या किमतीत घट,
केंद्राच्या हालचालीचा परिणाम
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी, एका आठवड्यापूर्वी खाद्यतेल वरील मानक शुल्काच्या दरात कपात करण्याच्या केंद्राच्या हालचालीचा परिणाम आता दिसू लागला आहे. कारण खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खाद्यतेलांवरील मानक आयात शुल्क कमी झाल्यानंतर घाऊक किमतीत मोठी घट झाली आहे. याबाबत ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी आकडेवारी जाहीर केली. त्यात म्हटले आहे की, देशात १४ सप्टेंबर रोजी शेंगतेल, मोहरीचे तेल, वनस्पती तेल, सनफ्लावर, पाम तेल, नारळ तेल आणि तिळाच्या तेलाच्या किमतीत घट नोंदविण्यात आली आहे. १४ सप्टेंब रोजी पाम तेलाचा दर २.५० टक्क्यांच्या घटीसह १२,३४९ रुपये प्रतिटन इतका नोंदवला गेला. एका आठवड्यापूर्वी हाच दर १२, ६६६ रुपये इतका होता.
तिळाच्या तेलाचे घाऊक दरही २.०८ टक्क्यांनी घसरून २३,५०० रुपये प्रति टन झाले. तथापि, घाऊक किमतीत नरमाई असूनही खाद्यतेल गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०% पेक्षा जास्त महाग आहे. गेल्या आठवड्यात रिफाइंडवरील आयात शुल्क कमी करून 32.5%करण्यात आले.
दरम्यान, तेलाच्या घाऊक दरात झालेल्या घटीचे पडसाद किरकोळ बाजारातही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ऐन सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.