महागाईचा भडका उडणार! कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलर च्याही पुढे जाण्याची शक्यता
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. जगभरातून रशियाचा निषेध करण्यात येत आहे. अनेक देशांनी युद्धबंदीची मागणी केली आहे. मात्र रशिया मागे घेण्यास तयार नसल्याने आता अनेक देशांकडून रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. पश्चिमेकडील देशांनी रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर जाऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. रशियावर निर्बंध घालण्यात आल्याने रशियातून कच्च्या तेलाचा व इतर गोष्टींचा पश्चिमेकडील देशांना पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे पुरवठा साखळी खंडित होईल. पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळे कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवू शकतो. परिणामी कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्याही वर जाऊ शकतात असा अदांज वर्तवण्यात येत आहे.
धातुंच्याही किमती वाढणार
याबाबत बोलताना काही व्यापारी आणि तज्ज्ञांनी सांगितले की, रशियावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा मोठा फटका हा जगातील अनेक देशांना बसण्याची शक्यता आहे. रशिया अनेक गोष्टींची निर्यात करतो. त्यामध्ये धातू, कच्चे तेल, अन्नधान्य अशा गोष्टींचा समावेश आहे. रशियावर आर्थिक निर्बंध आल्यामुळे रशियातून निर्यात होणारे उत्पन्न थांबेल. पुरवठा साखळी खंडीत झाल्यामुळे पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक वाढेल. त्यामुळे कच्च्या तेलासह धातुंच्याही किमती वाढण्याची शक्यता आहे.
पुरवठा साखळीवर परिणाम
याबाबत बोलताना कंसल्टंन्सी एनर्जी एस्पेक्ट्सच्या अमृता सेन यांनी म्हटले आहे की, येणाऱ्या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती शंभर डॉलरचा टप्पा पार करू शकतात. रशियाला युरोपीय देशांनी स्विफ्ट बॅंकिंग प्रणालीतून वगळ्यामुळे त्याचा मोठा परिणाम हा व्यापारावर होणार आहे. निर्यात केलेल्या वस्तुंचे पेमेंट रशियाला वेळत मिळू शकणार नाही. त्यामुळे कदाचित रशियाकडून होणाऱ्या वस्तुंचा पुरवठा ठप्प राहू शकतो. निर्यात बंद झाल्याने जागतिक बाजारपेठेत महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.