काँग्रेसला पुन्हा धक्का, अजून एका राज्यात पाच आमदारांनी हाती घेतले कमळ !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। सत्तेच्या डावपेचात भाजपाने काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यात अपयश आले असले तरी मणिपूरमध्ये काँग्रेसला सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले आहे. मणिपूरमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील सरकार अस्थिर करण्याची काँग्रेसची खेळी भाजपाने काँग्रेसवरच उलटवली असून, काँग्रेसच्या मणिपूरमधील पाच आमदारांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.
भाजपाच्या काही आमदारांनी दिलेले राजीनामे आणि मित्रपक्षाच्या आमदारांची नाराजी यामुळे मणिपूरमधील एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर झाले होते. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाने बजावलेला व्हिप धुडकावून लावत विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनाला दांडी मारली होती. त्यामुळे बिरेन सिंह सरकारला बहुमत मिळवणे सोपे गेले होते. दरम्यान, या सहा आमदारांनी काँग्रेससोबत विधानसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह सोमवारी या सर्व बंडखोर आमदारांना घेऊन दिल्लीत आले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर बिरेन सिंह यांनी ट्विट करून या भेटीबाबत माहिती दिली. तसेच विश्वास ठराव जिंकल्याबद्दल नड्डा यांनी सरकारचे अभिनंदन केले, अशी माहितीही त्यांनी दिली. मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकाराने विश्वासमत ठराव १६ विरुद्ध २८ मतांनी जिंकला होता. सभागृहातील आघाडी सरकारकडे विधानसभा अध्यक्षांसह २९ सदस्यांचे पाठबळ होते. तर विरोधी काँग्रेसकडे २४ आमदार होते. मात्र या आमदारांपैकी ८ जणांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला नाही. या विश्वास ठरावात भाजपा सरकारचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र काँग्रेसचे आठ आमदार अनुपस्थित राहिल्याने भाजपाचा मार्ग अधिकच सोपा झाला होता.
Delhi: Five Manipur MLAs who joined BJP today after they had resigned from Congress, meet party's national president Jagat Prakash Nadda. pic.twitter.com/t03uPYwGzR
— ANI (@ANI) August 19, 2020