राज ठाकरेच्या “त्या दाव्याला” चंद्रकांत पाटलांचा शिक्कामोर्तब : म्हणाले, राज म्हणतात ते बरोबर!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे, प्रतिनिधी : राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुका ओबीसी आरक्षणाखाली पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव आहे, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करत शिक्कामोर्तब केलं आहे. राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा वेगळा अर्थ का काढता?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे. तुम्ही लगेच वेगळा अर्थ काढता. ओबीसी आरक्षणावर एक महिन्यात निर्णय येऊ शकतो. ओबीसींच शिक्षणातलं आरक्षण गेलं नाही. राजकीय आरक्षण गेलंय. राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे, कारण त्यांना आरक्षणाच्या नावाखाली निवडणूका पुढे ढकलायच्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूका हरणार म्हणून ते निवडणूका पुढे ढकलत आहेत. राज ठाकरे आता बोलायला लागलेत. अण्णा हजारे बोलायला लागले आहेत. अशा ताकदी रस्त्यावर उतरल्याशिवाय याचा खोटारडेपणा बाहेर येणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.