‘महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’- पालकमंत्री पाटील
जळगाव (प्रतिनिधी)। आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भाजपकडून सरकार पडणार असा दावा केला जात आहे. पण त्याला काही एक अर्थ नाही. महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणजे हे भाजपचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत. आपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमचे सरकार कोसळणार नाहीच, उलट भाजपने त्यांचे आमदार सांभाळावेत. नाही तर ते आमच्याकडे येतील, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर येथील अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, भाजपकडून महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची सुरू असलेली चर्चा, राज्य सरकारकडून होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा विविध विषयांवर मते मांडली. भाजपच्या सरकार कोसळणार असल्याच्या टीकेला त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. गुलाबराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असा दावा भाजपकडून कितीही सुरू असला तरी त्याला काहीही अर्थ नाही. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचा हा दावा सुरू आहे. राजस्थानचे सरकार पडणार अशी चर्चा होती. राजस्थानचे सरकार आम्ही पाडू, असा भाजपचा दावा होता. मात्र, आपण पाहिले की राजस्थानच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. राजस्थानचे बहुमत पाहिले तर ते अवघे 10 ते 20 मतांचे होते. आपल्याकडे 170 आमदार एकत्र आहेत. म्हणजेच सरकार पडणार हे भाजपचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत. आपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, मग आपले सरकार येईल. आपले मंत्री होऊन आपली कामे होतील, अशा प्रकारची लालसा भाजप आपल्या आमदारांना दाखवत आहे. पण आमचे सरकार पाच वर्षे सुरळीतपणे चालणार आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.