ब्रेकिंग : संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती.
मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, राऊत यांच्या घरी ईडीची चौकशी किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही. अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने दोनदा संजय राऊत यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं.