Remdesivir च्या बाटलीत चक्क पॅरासिटामॉल भरुन विक्री, रॅकेटचा पर्दाफाश; चौघांना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे (समिर देशमुख)। रेमडेसिवीरच्या बाटलीत चक्क पॅरासिटामॉल मिसळून रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून विक्री करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेमेडसिवीर इंजेक्शन 35 हजाराला विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक केल्यानंतर त्याने तोंड उघडल्यावर ही धक्कादायक माहिती पुढे आली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आरोग्य यंत्रणाही कमी पडत असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीये तर कुठे रेमडेसिवीर ऑक्सिजनचा तुटवडा अश्या गंभीर समस्या येत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडाचा गैरफायदा घेऊन बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा बनावट रेमडेसिविर विक्रीमध्ये सहभाग आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला देखील मोठा धक्का बसला आहे. बारामती शहरातील फलटण चौकात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी संबंधित युवकाने बोलावल्यानंतर सापळा लावून तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एक इंजेक्शन 35 हजार या प्रमाणे दोन इंजेक्शनचे 70 हजार रुपये घेतले गेले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर एका दवाखान्यातील कर्मचारी रिकाम्या झालेल्या रेमडेसिवीरच्या मोकळया बाटल्या आणून त्यात सिरींजने पॅरासिटामॉल मिसळून पुन्हा फेव्हिक्विकच्या मदतीने या बाटल्या बंद करुन पुन्हा त्या बाजारात नव्या म्हणून काळ्या बाजारात जादा दराने विक्री करण्याचा हा गोरखधंदा सुरु होता.
कोविड सेंटरमध्ये सफाई कार्मचारी म्हणून काम करीत असलेल्या अवघ्य २२ वर्षाचा संंदिप गायकवाड हा मोकळ््या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल भरून मुख्य सुत्रधार दिलीप गायकवाड याच्याकडे देत होता. या बदल्यात संदिपला १० ते १२ हजार रूपये दिले जात होते. सिरिंजच्या सहाय्याने या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल भरून अवघ्या दहा ते पंधरा रूपयात ही बनावट रेमडेसिव्हीर तयार करून ३५ हजार रूपयांना एक या प्रमाणे काळया बाजाराने विकले जात होते. तसेच रेमडीसीव्हीरच्या मागणीसाठी कोणी संपर्क साधला तर इंजेक्शन पोहचवण्याची जबाबदारी प्रशांत घरत व शंकर भिसे यांच्यावर होती. आतापर्यंत या रॅकेटमध्ये मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३५, रा. काटेवाडी, ता. बारामती) याच्यासह प्रशांत सिध्देश्वर घरत (वय २३, रा. भवानीनगर, ता. इंदापूर),संदिप संजय गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), शंकर दादा भिसे (वय २२, रा. काटेवाडी, ता. बारामती) यांना बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.